मुंबई : करोनाचे संकट टळल्यानंतर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) पर्यटकांप्रमाणेच वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अभ्यासकांची पावले वळू लागली आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून घाटकोपर आणि कल्याण येथील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठी राणीच्या बागेत हजेरी लावली आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीही राणीच्या बागेत आयोजित करण्यात येऊ लागल्या आहेत.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानविद्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी राणीच्या बागेला भेट देत असतात. विविध प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींचा एकाच ठिकाणी अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून राणीच्या बागेत घाटकोपरमधील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि कल्याणमधील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र व पर्यावरणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. या महाविद्यालयांतील विद्यार्थिनी वंदना यादव, सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे सध्या राणीच्या बागेत येऊन वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. उद्यानातील रोपांचे वर्गीकरण आणि ओळख, उद्यानातील रोपांचे संगोपन, तसेच पक्ष्यांचे जीवनमान, झाडांचे महत्त्व, फुलपाखरे आदी विविध घटकांबाबत त्यांचा अभ्यास सुरू आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासक विद्यार्थिनी जुलीया कनेको आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी राणीच्या बागेत दाखल झाली होती.
हेही वाचा >>>म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : कोकण मंडळाच्या धर्तीवर घरांसाठी १० टक्के आणि ९० टक्के रक्कम भरण्याची मुभा द्यावी
हेही वाचा >>>महिलांनो ओढणी गळ्यात घेऊन बाईकवर बसताय? वसईतील हृदयविदारक घटना डोळे उघडेल, मंदिरातून येतानाच…
पक्ष्यांचा किलबिलाट, विविध प्राण्यांचा वावर आणि निसर्गसंपदेने नटलेल्या राणीच्या बागेत विविध प्रकारची झाडे, दुर्मिळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहलींचेही आयोजन करण्यात येते. घाटकोपर साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटी आणि माटुंगा येथील दोन शाळांतील एकूण २०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, तसेच निरनिराळ्या फुलझाडांविषयी माहिती दिली.