नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग रविवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. मात्र या मार्गादरम्यान खानपान, शौचालय, गॅरेज अशा सुविधा नसल्याने वाहनचालक-प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान जशा सुविधा आहेत तशा सुविधा समृद्धीवर विकसित होण्यासाठी किमान वर्षभर वाट पहावी लागणार आहे. कारण १८ फूड प्लाझा आणि इतर सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीए) निविदा प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करत या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
हेही वाचा >>>‘आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात’ झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांवर आशिष शेलार संतापले; म्हणाले “हे अफगाणी संकट…”
मुंबई ते नागपूर (७०१ किमी) समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या महामार्गाला वाहनचालक-प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या ५२० किमीच्या प्रवासात वाहनचालक-प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. कारण या महामार्गावर १८ पेट्रोल पंप वगळले तर इतर कोणतीही सुविधा नाही. प्रवासात खानपान, शौचालय आणि गॅरेज, रुग्णवाहिका, पोलीस सुरक्षा यासारख्या अन्य सुविधा महत्त्वाच्या असतात. मात्र यातील कोणत्याही सुविधा सध्या समृद्धीवर नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या सुविधा उपलब्ध करून देण्यापूर्वीच महामार्ग का खुला करण्यात आला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा >>>गिरणी कामगारांचा २२ डिसेंबरला नागपुरात मोर्चा; घरांच्या मागणीसाठी राज्यभरातील कामगार नागपुरात धडकणार
याविषयी एमएसआरडीसीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी लवकरात लवकर खानपान आणि इतर सुविधा व्यापक स्वरूपात समृद्धीवर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला मिळून एकूण १८ पेट्रोल पंपांची सोय लोकार्पणाच्या वेळीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता याच पेट्रोल पंपावर पाणी आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ही सोय तात्पुरती असून फूड प्लाझा आणि इतर सुविधा व्यापक स्वरूपात विकसित करण्यासाठी किमान वर्ष लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकार्पणाच्या काही दिवस आधी १८ फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा सादर करण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर फूड प्लाझा आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी, त्या सुरू करण्यासाठी वर्ष लागले असेही या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक सुविधाही आता हळूहळू उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.