मुंबई : बारसू प्रकल्पाचे सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू, असा इशारा प्रकल्पविरोधी लढय़ातील मार्गदर्शक सत्यजित चव्हाण यांनी दिला. तसेच आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, अशीही भूमिका चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी रिफायनरीविरोधी संघटनेचे (बारसू-सोलगाव पंचक्रोशी) सरचिटणीस नरेंद्र जोशी आणि अध्यक्ष वैभव कोळवणकर उपस्थित होते.

कोकण विकासाचे मॉडेल हे आमच्याच म्हणण्याप्रमाणे अपेक्षित आहे. कोकणामध्ये विकास करताना पेट्रोकेमिकल झोन तयार करणारे, मानवासह निसर्गाला हानी करणारे प्रकल्प नकोत. यासंदर्भात राज्य सरकारला वारंवार निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी अद्याप भेट दिलेली नाही. एक रिफायनरी प्रकल्प झाल्यास भविष्यात इतर धोकादायक प्रकल्प उभे राहतील. त्यामुळे प्रदूषणात वाढ होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून तेथील पाच गावांतील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेचे ठराव या प्रकल्पाविरोधात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी चार हजारांहून अधिक ग्रामस्थ बारसू सोलगावच्या सडय़ावर उपस्थित आहेत. हे ग्रामस्थ बाहेरून आलेले नसून आजूबाजूच्या गावातील स्थानिक आहेत. रिफायनरीमुळे त्यांच्या गावावर परिणाम होणार असल्याने त्यानीही विरोध केला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader