देवनार कचराभूमीवरील कचरावेचकांच्या रोजगारावर गदा; पाच दिवसांपासून प्रवेश बंद
कागद, चिंधी, बाटल्या, लाकूड, लोखंड आदी सुका कचरा गोळा करणारे कचरावेचक हे चित्र देवनार कचराभूमीवर नेहमीच दिसते; परंतु गेल्या आठवडय़ात लागलेल्या आगीमुळे हे चित्र काहीसे बदलले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये धुमसत असणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याने येथे कचरा वेचणाऱ्या कामगारांना गेल्या पाच दिवसांपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील कचऱ्यावर उपजीविका असलेल्या पाचशे ते सहाशे कचरावेचकांना आपली पोटे कशी जाळायची, असा प्रश्न आहे.
आगीमुळे या कामगारांनी कचराभूमीच्या अंतर्गत भागात गेले काही दिवस राबून वर्गीकरण करून ठेवलेला कचराही भस्मसात झाला आहे. सुमारे ५०० ते ६०० कचरावेचक वर्षांनुवर्षे येथे काम करतात. यात महिला कामगारांची संख्या मोठी आहे. सायन, सांताक्रूझ, गौतमनगर, कुर्ला आदी भागांत हे कामगार राहतात.
आग लागल्यानंतर या कामगारांना प्रवेश बंद केल्याने सोमवारी मोजकेच कामगार येथे दिसत होते. कचराभूमीच्या प्रवेशद्वारापाशी काही दिवसांपूर्वी वर्गीकरण करून ठेवलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याभोवती हे कामगार आग विझण्याची वाट पाहत बसले होते. आगीमुळे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील गलथानपणा पुढे आला आहे. ‘स्त्री मुक्ती संघटना’, ‘अपनालय’, ‘परिसर भगिनी विकास संघ’ आदी सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमांतून या कामगारांचे गेल्या काही वर्षांपासून संघटन व प्रशिक्षण होत आहे; परंतु याव्यतिरिक्त कोणतेही राजकीय पाठबळ नसलेल्या या कामगारांसमोर निर्माण झालेला उपजीविकेचा प्रश्न आगीमुळे पसरलेल्या धुरात दिसेनासा झाला आहे!

रोज सकाळी सात-आठ वाजल्यापासून रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत कचऱ्यामधून सुका कचरा गोळा करायचा. त्याचे वर्गीकरण क रून प्रत्येकी सुमारे तीनशे ते चारशे किलोग्रॅम कचरा गोळा करून त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या बाजारांत विकायचा. यातून प्रत्येकी सुमारे दोनशे ते पाचशे रुपये दररोजची कमाई होते. – सुगंधा सपकाळ

 

Story img Loader