मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांत रविवारी ७४ टक्के पाणीसाठा जमा झाला. पाणीसाठा वाढलेला असला तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून १० लाख ७० हजार दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ७३.९९ टक्के आहे. पाणीसाठा वाढलेला असला तरी सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे.

मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी ही चार धरणे भरल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस आढावा घेऊन पाणी कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, आता प्रशासनाने आणखी आठ- दहा दिवस प्रतीक्षा करून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास धरणे भरू शकणार नाहीत. तसेच भातसा आणि ऊर्ध्व वैतरणामध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पालिका प्रशासनाने सावध पावले उचलली आहेत.

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. हे तलाव पूर्ण भरलेले असतात तेव्हा सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर असतो. सातही धरणातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो.

भातसामध्ये केवळ ६६ टक्के पाणी..

सात धरणांपैकी मुंबईतील तुळशी व विहार हे तलाव भरून वाहू लागले आहेत. तर, पालघर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पडलेल्या पावसामुळे तानसा आणि मोडक सागर ही धरणे देखील काठोकाठ भरली आहेत. मात्र मुंबईला सर्वात जास्त पाणी पुरवठा करणारे भातसा हे सर्वात मोठे धरण अद्याप केवळ ६६ टक्के भरले आहे. तर ऊर्ध्व वैतरणा हे धरण ४९ टक्के भरले आहे.

धरणात किती पाणीसाठा? (टक्क्यांत)

उर्ध्व वैतरणा    ४९.७९ टक्के

मोडक सागर १०० टक्के

तानसा १०० टक्के

मध्य वैतरणा    ८९.५१ टक्के

भातसा ६६.३८ टक्के

विहार   १०० टक्के

तुलसी १०० टक्के