मुंबई : ठाणे परिसरात वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी रात्री मुलुंडमधील एका उद्यानातील शौचालयात सापडला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तिने आत्महत्या केल्याचा मुलुंड पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंडच्या वसंत उद्यानामधील शौचालयात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना काही स्थानिक रहिवाशांनी दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ महिलेला महानगरपालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मुलुंड पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता तिचे नाव स्नेहल बोबडे (३४) असल्याचे, तसेच ती ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा – मुंबईत ऑक्टोबरमध्ये १० हजारांहून अधिक घरांची विक्री, सणासुदीच्या काळातही घरविक्री स्थिरच
मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासात ही महिला गेल्या अनेक महिन्यांपासून या उद्यानात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केल्याचा संशय असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.