मुंबई : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ४३ वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी मारली. ही महिला दादर येथील रहिवासी असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला. नवी मुंबई पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंजल कांतीलाल शाह (४३) असे महिलेचे नाव आहे, ती दादर येथील रहिवासी आहे. महिला बेपत्ता झाल्यानंतर मुंबईतील भोईवाडा पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता महिला टॅक्सीने अटल सेतूवर गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अटल सेतूवरून तिने उडी मारल्याचे निष्पन्न झाले. महिला व्यवसायाने डॉक्टर असून गेल्या १० वर्षांपासून त्या प्रॅक्टीस करीत नव्हत्या. त्या आठ वर्षांपासून मानसिक तणावाखाली होत्या. त्याबाबत त्यांच्यावर उपचार सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी महिला बेपत्ता असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट
हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार
किंजल यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी कुटुंबीयांना घरात सापडली. कुटुंबीयांनी चिठ्ठी घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. महिलेने कामानिमित्त घरातून बाहेर जात असल्याचे सांगितले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीत किंजल सोमवारी दुपारी १.५० वाजता घरातून बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. दुपारी १.४५ च्या सुमारास ती दादरमधील शिंदेवाडी परिसरातून टॅक्सीत बसून अटल सेतू पुलाच्या दिशेला गेली. नवी मुंबईच्या दिशेने सुमारे १४ किलोमीटर अंतरावर पुलावर तिने टॅक्सी थांबवली, टॅक्सीतून खाली उतरल्यानंतर तिने समुद्रात उडी मारली. त्यानंतर टॅक्सी चालकाने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस समुद्रात शोधमोहीम राबवत आहेत.