मुंबई : सोनेरी कोल्हा आणि भटक्या श्वानांमधील संघर्षाच्या घटना घडत असताना मंगळवारी चेंबूरमध्ये एका पिसाळलेल्या सोनेरी कोल्ह्याने तरुणावर हल्ला केला. या कोल्ह्याने तरुणाच्या उजव्या पायाचा चावा घेतला आहे. सोनेरी कोल्ह्यांचा रेबीजमुळे होणारा मृत्यू आणि कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे चेंबूर परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. एका गृहसंकुलातील आवारात सोमवारी सकाळी ही घटना घडली. चेंबूर येथे वास्तव्यास असलेला सनी ढसाळ सकाळी परिसरातून जात असताना त्याला सोनेरी कोल्हा दिसला. प्रथमदर्शनी कोल्हा जखमी आणि अशक्त वाटत होता. त्यामुळे सनी त्याला बघण्यासाठी पुढे गेला. त्याच क्षणी कोल्ह्याने तरुणावर हल्ला केला, त्याच्या उजव्या पायाला कोल्हा चावला. सनीला तातडीने रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. त्या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला होता. त्याच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार सुरू झाल्याने धोका टळला.
दरम्यान, चेंबूर परिसरात आतापर्यंत रेबीजची लागण होऊन तीन कोल्ह्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि आसपासच्या परिसरात मॅपिंग सुरू केले असून, सोनेरी कोल्ह्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ठाण्याचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ, सोनल वळवी, ज्ञानेश्वर रक्षे तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या नेहा पंचमिया, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांचा समावेश आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली नोंद होती. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही रेबीजची लागण होऊन दोन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता.
‘कोल्ह्यापासून दूर राहा’
नागरिकांनी काय काळजी घ्यावी कोल्ह्याने हल्ला केल्याची ही दुसरी घटना असल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. परिसरात संशयास्पद कोल्हा आढळल्यास त्याला मारण्याचा अथवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा तो घाबरेल असे कोणतेही कृत्य करू नये. तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विनया जंगले यांनी केले आहे.
चेंबूर आणि आसपासच्या परिसरात वनविभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच कांदळवन कक्षाचे बचाव पथक दिवसा आणि रात्री तैनात असतात. या परिसरावर विशिष्ट लक्ष ठेवले जात आहे. तसेच परिसरात सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. पवन शर्मा, अध्यक्ष रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर (रॉ)