मुंबई: पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकादरम्यान एक तरुण रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, लोकलच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवून आपत्कालीन ब्रेक दाबला आणि आत्महत्या करणाऱ्या २५ वर्षीय तरूणाचे प्राण वाचविले. त्यानंतर तात्काळ आरपीएफ जवानाने तरुणाला रेल्वे रुळावरून हटवून लोकलचा मार्ग खुला केला.
चर्चगेट-विरार ही रविवारी रात्री ९.२२ ची जलद लोकल मोटरमन हरिश ठाकूर चालवत होते. रात्री ९.४४ वाजण्यादरम्यान वांद्रे स्थानकातून लोकल पुढे गेली असता, एक तरूण धावती लोकल पाहून रेल्वे रूळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे ठाकूर यांना दिसले. यावेळी हाॅर्न वाजवून तरुणाला बाजूला सरकण्याचा इशारा केला. मात्र तरूण बाजूला होत नसल्याने आणि लोकलचा वेग कमी असल्याने ठाकूर यांनी लोकल थांबवून नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. तत्काळ घटनास्थळी आरपीएफचा जवान येऊन त्याने तरुणाला सुरक्षितस्थळी नेले. त्यानंतर लोकल मार्गस्थ झाली.