मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना ( शिंदे गट ) आमदार, सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आदेश बांदेकर यांच्याकडे होती. अशातच सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून सदा सरवणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची निवड झाली आहे. याबद्दल श्री सदा सरवणकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा!”, असं प्रसाद लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला होता. तेव्हा सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. पण, चौकशीनंतर सरवणकर यांना क्लिन चिट मिळाली होती. याच प्रकरणामुळे सरवणकर यांचं मंत्रीपद हुकल्याची चर्चा होती.
हेही वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले “फक्त १३ दिवसांसाठी…”
अशातच आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांच्याऐवजी सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.