अवघ्या अडीच हजार रुपयांत आधार कार्ड
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाकडे आधार कार्डासह निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना आणि पॅन कार्ड आढळले आहे. पश्चिम बंगालमधील एका ग्रामपंचायतीच्या दाखल्यावरून अवघ्या अडीच हजारात हे सर्व परवाने बांगलादेशी नागरिकाला बनवून मिळाले आहेत.
विशेष शाखेने पी. डिमेलो रोडवरील फॅन्सी बारवर छापा घालून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यापैकी एकाकडे आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र सापडले आहे.
एका भारतीय एजंटने अवघ्या अडीच हजार रुपयांत ही कागदपत्रे बनवून दिली होती. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या इसमाकडे पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गझना ग्रामपंचायतीचा एक दाखला आढळला. या दाखल्यावर हा इसम गझना ग्रामपंचायतीचा रहिवाशी असल्याचे नमूद केले होते. याच दाखल्याच्या आधारे ही सर्व कागदपत्रे बनविणयात आली होती, असे पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे यांनी सांगितले. ही कागदपत्रे बनावट असल्याचा आमचा संशय आहे.
आम्ही गझना ग्रामपंचायतीकडेही या दाखल्याबाबत विचारणा करणार आहोत, असेही शिंत्रे म्हणाले. या कागदपत्रांच्या आधारे हा बांगलादेशी इसम दोन वर्षे आरामात भारतात वास्तव्य करीत होता. बांगलादेशी नागरिक सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये आणि नंतर तेथून मुंबईत येत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा