मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘धडक मोर्चा’चं आज ( १ जुलै ) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार आल्यानंतर मुंबईतील लुटारूंना जेलमध्ये टाकणार, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मुंबई महापालिकेची एसआयटी चौकशी सुरु केली आहे. त्याप्रमाणे पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिकची सुद्धा करा. याबाबत राज्यपालांना आम्ही विनंती केली आहे,” असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमच्या फाइल्स तयार, आमचं सरकार आल्यावर…”, आदित्य ठाकरेंचा मुंबई पालिका अधिकाऱ्यांना इशारा

“मला नगरसेवकांनी म्हटलं, एक-दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा फोन येतो. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ऑफ दिली आहे, असं अधिकारी सांगतात. त्याचं रेकॉर्डिंग हाती आलं आहे. दाखवायचे तिथे दाखवणार आहे,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“पाच रस्ते कंत्राटदारांना पाच पाकिटे देण्यात आली. पण, मी रस्त्यांचा विषय हाती घेतल्यावर जूनपर्यंत ४०० किलोमीटर नाहीतर, फक्त ५० रस्ते करू सांगितलं. यांना ५० शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जानेवारीतील काम एप्रिल, मे मध्ये सुद्धा सुरु केलं नाही. मग कोणते रस्ते तुम्ही पूर्ण करणार आहात?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके…”, मोदी-शाहांचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल!

“५० रस्ते पूर्ण करू शकणार नाही, हे बोलल्यावर भाजपा, मिंधे गट आणि खोके सरकारने माझ्यावर टीका केली. तुम्ही मला पप्पू बोलताय ना… तुम्हाला पप्पू आव्हान देतोय, या अंगावर… एकटे या किंवा पूर्ण फौज घेऊन या. माझ्या छातीवर वार करण्यासाठी या… माझी तयारी आहे,” असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray attacks bjp and shinde group over call pappu in morcha mumbai ssa