महाराष्ट्र-कर्नाटक वाद विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलं होतं. त्यात आज ( ८ डिसेंबर ) पुन्हा कर्नाटकातील गदगमध्ये महाराष्ट्र नोंदणीच्या ट्रकवर काळे फासण्यात आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका केली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राने संयम पाळला असून, त्यांच्यासारखा धुडगूस घातला नाही. पण, संयमाचा अंत पाहू नका. बेळगावात दोन मंत्री जाऊन काय, कोणाशी आणि कशावर चर्चा करणार होते. तो प्रांत महाराष्ट्राचा आहे, त्यावर चर्चा होऊ शकते का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यावर आपले मंत्री घाबरले. घाबरट सरकार असेल तर राज्याला पुढे कसं नेणार. त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मधला मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. न्यायालयात लढाई सुरु असताना, कर्नाटकाकडून सुरु असलेलं योग्य नाही.”
“गुजरात निवडणुकीसाठी प्रकल्प पळवण्यात आले. तसेच, कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवण्याचं काम सुरु आहे का?”, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी खरा मुख्यमंत्री कोण आहे, हे सांगितलं. तरीसुद्धा त्यांच्यांकडून सीमाप्रश्नावर एक शब्दही येत नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना नाव लावण्याचा अधिकार नाही. जे घाबरट आहे, ते स्वत:ला शिवसेना म्हणू शकत नाही. घाबरट सरकार जनतेला पुढे नेऊ नाही शकत,” असे टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सोडलं आहे.