एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यापासून ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला आहे. अशातच युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, युवासेना नेते राहुल कनाल शिवसेनेत ( शिंदे गट ) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल कनाल यांच्या पक्षप्रवेशावर श्रीकांत शिंदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलं. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास वाढत आहे. रोज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लोक जोडली जात आहेत. आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरु आहेत.”
“येणाऱ्या काळातही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरु राहणार आहेत. कारण, तळागळातील लोकांसाठी निर्णय घेण्याचं काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत,” असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मंत्र्यांची नावं आणि खाती…”
दरम्यान, यापूर्वी सिद्धेश कदम, अमेय घोले यांनीही युवासेनेला रामराम ठोकला होता. त्यात राहुल कनाल शिंदे गटात गेल्यास आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जाईल.