केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तसेच त्यांनी भाजपाला धोका दिल्याचा आरोप करत त्यांना या धोक्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं वक्तव्य केलं. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंना जमीन दाखवा असं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करत मिशन १५० ची घोषणा केली. यावर आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोमवारी (५ सप्टेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मी अमित शाह यांच्या वक्तव्यावर काहीही बोलू शकत नाही. जो खरा कट रचला गेला होता तो लोकांसमोर येत आहे. मी त्यांच्यावर तर काही बोलणार नाही. मात्र, माझी प्रतिक्रिया घेण्याआधी आमच्या मनात प्रेम आणि आदर असणाऱ्या ४० लोकांची पहिली प्रतिक्रिया घेतली पाहिजे.”
“मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला एकटं पडू देणार नाही”
दोन जागांवरून शिवसेनेने युती तोडली या अमित शाहांच्या आरोपावर आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीवर कुठे बोलायचं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला सांभाळून घेत आहे. आमच्यासोबत आहे आणि आम्हाला एकटं पडू देणार नाही ही खात्री आहे.
“लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत आहेत”
“मी सध्या गणपतीचं दर्शन घेत आहे आणि यावेळी लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत आहेत हे सर्वजण पाहत आहेत,” असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असा आरोप केला. तसेच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचाही आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडवला.
हेही वाचा : गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर
जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेखही केला. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली असं शाह म्हणाले. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असंही शाह यांनी भाषणामध्ये म्हटलं.