केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालंय. शिवसेनेचे नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही, पण ज्यांनी आत्माच विकला होता त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेतील फूट, भाजपाची खेळी, शिवसेनेची कार्यशैली अशा विविध विषयांवर ऊहापोह केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरीबाबत कुणकुण लागली होती. मात्र वर्षांनुवर्षे जे पक्षात होते व पक्षाने त्यांना मोठे केले, सारे निर्णय त्यांच्या मनासारखे घेतले, ते असे करतील असे कधीच वाटले नव्हते. अशांवर अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही. हे बाळासाहेबांपासून चालते आले व त्यानुसारच शिवसेना पक्षप्रमुख वागले. बंडखोरांनी त्यांचा आत्माच विकला होता. म्हणून त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता.”
शिवसेनेत झालेल्या बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख आजारी असताना बंडाची थोडीफार कुणकुण लागली होती. त्यांच्याकडे नंतर विचारणा करण्यात आली असता त्यांनी असा काही विचार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवसेनेने यांना मोठे केले.”
“सत्ता आल्यावर प्रत्येक मुख्यमंत्री नगरविकास खाते स्वत:कडे ठेवतो, अशी राज्यात परंपराच पडली होती. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा खंडित करीत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते सोपविले. त्यांच्यावर पक्षाने पूर्ण विश्वास टाकला. विश्वास टाकला तर १०० टक्के ठेवायचा अन्यथा नाही, हे माझे आजोबा बाळासाहेब नेहमी सांगायचे. यांच्यावर आम्ही सारा विश्वास टाकला होता; पण यांनी घात केला, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा : नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात, अनिल देसाई म्हणाले “अत्यंत घाईत…”
“असो, जे घडले ते पचविताना मनाला थोड्या वेदना झाल्या; पण बरे झाले घाण गेली! पक्षाने सारे यांच्या मनासारखे केले. मंत्रीपद, विधीमंडळ पक्षनेतेपद, विरोधी पक्षनेतेपद ही सारी पदे यांनाच दिली. यांना अजून काय हवे होते? एवढे पक्षाने देऊनही त्यांनी विश्वासघात करत गद्दारी केली,” असंही मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
भाजपचे वावडे आहे का? कोणाबरोबर बोलणे होते का?
भाजपचे वावडे आहे का? कोणाबरोबर बोलणे होते का? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “सार्वजनिक जीवनात काम करताना कोणाचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही; पण मागील चार महिन्यांपासून भाजपच्या कोणाशीही बोलणे नाही. कसलाच संपर्क नाही; पण तुमच्या लक्षात आले असेलच की आज शिवसेना, ठाकरे कुटुंबातील सदस्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर, कमरेखालची टीका करणारे भाजपतील नेते कोण आहेत व त्यांना कोणाची फूस आहे हे सारे लपून राहिलेले नाही.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी बोलताना आदित्य म्हणाले की, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर पक्षदेखील त्यांना पाठिंबा देत आहेत.