गोरेगाव येथे शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. राज्याच्या ‘सीएम’चा नवीन अर्थ लावला जाणार आहे. ‘सीएम’ म्हणजे ‘करप्ट माणूस’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हे सरकार संविधान बदलणार आहे. त्यामुळे सावध होणं गरजेचं आहे, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
“या अंधारात देखील आपल्या हातात एक वेगळं शस्त्र आहे. ते म्हणजे मशाल. आपल्या सभेला गर्दी होते. पण, त्यांच्या सभेला फक्त खुर्च्यांची गर्दी होते. ३३ देशांत जिथे जिथे गद्दारांची नोंद घेतली, तिथे हे पटलं नाही, हे सर्व्हेतून समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकरच जाणार आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा : शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ आरोपांना प्रियंका चतुर्वेदींचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आमचं नाव घेऊन…”
“गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, तरीही शेतकऱ्यांना एक रूपयाही मिळाला नाही. आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, ते पूर्ण करून दाखवलं. आज शेतकरी सांगत आहे, उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती मिळाली. या सरकारचं काहीच नाही मिळालं,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
हेही वाचा : “मंत्रीपदाचा सट्टा लावूनच आम्ही…”, गुलाबराव पाटलांचं सत्तासंघर्षाबाबत विधान
“शेतकरी सांगत आहेत, आमच्या पुढच्या पिढीने शेतकरी होऊ नये. मग आपण खाणार काय? घटनाबाह्य मुख्यमंत्री डाव्होसमध्ये फक्त २८ तास राहिले आणि ४० कोटी खर्च केले,” असे टीकास्र डागत, “मुंबईवर २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. येणाऱ्या २५ वर्षात देखील शिवसेनेचीच सत्ता राहणार,” असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.