शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. “बंडखोर आमदारांनी हिंमत असेल, तर आज महाराष्ट्रात यावं आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्या प्रत्येक आमदाराला मी पाडणार,” असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच एका मित्राने बंडखोर आमदार महाराष्ट्रात आल्यावर तुमचं आडनाव काही दिवसांसाठी ठोकरे करा असा सल्ला दिल्याचा किस्साही सांगितला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मला काल एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की, आदित्य तुम्हाला आता लढा द्यायचा आहे. गद्दार आमदार कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आहेत. मी म्हटलं बरोबर आहे. त्यावर तो म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा. मी म्हटलं ठोकरे नाही, ठोकरेपेक्षाही ठाकरे हे नाव अधिक शक्तीशाली आहे.”
“विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कोठून जातो?”
“कधी ना कधी ‘फ्लोअर टेस्ट’ होणार आहेच. मात्र, त्याआधी विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कोठून जातो? कदाचित ते राज्यात सीआरपीएफ तैनात करतील, कदाचित सैन्य तैनात करतील, हेलिकॉप्टर, रणगाडे आणतील. प्रत्येक शिवसैनिक उभा राहणार आहे आणि पाहणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.
“”मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा”
“मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा. उद्धव ठाकरे यांच्या समोरही बसण्याची गरज नाही. आम्ही काहीही करणार नाही, हाताची घडी, तोंडावर बोट. तेव्हा मी डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे की काय कमी केलं तुम्हाला? कोणाच्या नावावर निवडून आले आहात तुम्ही?” असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
“राक्षसी महत्त्वकांक्षा असणाऱ्यांची गळचेपी कुठेही होऊ शकते”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “प्रचार करताना यांचे चोचले पाहून घ्यायचे, तिकिट देताना यांची नाराजी पाहायची. जे निधी मिळाला नाही म्हणतात त्यांची संपूर्ण यादी आहे. ज्यांच्या महत्त्वकांक्षा राक्षसी आहेत त्यांची गळचेपी कुठेही होऊ शकते. प्रत्येक मतदारसंघात अमाप निधी मिळाला आहे. आम्ही निधी देतो तो उपकार करत नाही. लोकांच्या कामासाठी जनतेचा पैसा देत असतो. हा स्वतःला विकून घ्यायला आणि द्यायला पैसा नसतो.”
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा : “विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो”, ‘मॅव मॅव’चा उल्लेख करणारी नितेश राणेंची पोस्ट चर्चेत
“अनेकदा प्रसंग वेगवेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, कधी वेगळं कारण असेल. २-४ लोकांनी फोन करून सांगितलं की, आम्ही लाचार झालोय, आम्ही तुमचेच आहोत. काही गोष्टींचं दुःख आहे. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिथं गेला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. मनाने तरी ते तिथं नसतील. तो माणूस माझ्या कार्यालयात रोज बसायचा, रस्त्याचं, फुटपाथचं, एसआरए, वनविभाग कशाचंही काम असो त्यांचं प्रत्येक काम मी केलं. फोन करून, मेसेज करून सांगायचे मी लगेच काम झालं म्हणून समजा सांगायचो,” अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.