मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी यासाठी आमदार आदित्य यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅव्हेट दाखल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य यांनी वकील राहुल आरोटे यांच्यामार्फत हे कॅव्हेट दाखल केले आहे. त्यात त्यांनी, सीबीआयकडूनच या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. असे असताना याचिकेद्वारे पुन्हा तीच मागणी कशी काय केली जाऊ शकते ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, ही फौजदारी जनहित याचिका सुनावणी घेण्यायोग्य नसल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : “शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेतही आहेत आणि विरोधातही जगात कुठे अशी…”, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बोचरी टीका

‘सुप्रीम कोर्ट अॅण्ड हायकोर्ट लिटिगंट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने अध्यक्ष रशीद खान पठाण यांच्यामार्फत सप्टेंबरमध्ये ही फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका केली होती. तसेच, सुशांत आणि दिशा यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी ठाकरे यांना तात्काळ अटक करण्याची आणि त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. याचिका अद्याप सुनावणीसाठी आलेली नाही.

हेही वाचा : “मोदी भाजपा-आरएसएसच्या गुंडांचे…”; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न, म्हणाले…

सुशांत हा १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली असताना, सुशांत याच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तसेच, बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू आहे. याशिवाय, रिया ही अमलीपदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही दिल्याच्या आरोपांचा केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभाग तपास करत आहे.

हेही वाचा : अंधेरीतील नवे क्रीडासंकूल वादात, उद्घाटनापूर्वीच दुरूस्तीची वेळ

दुसरीकडे, दिशा हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray moves mumbai high court disha salian and sushant singh rajput death case mumbai print news css