Aaditya Thackeray on BEST Bus Fare Hike : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली असून मुंबईकरांना आता बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. यावरून आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता. त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत.

भाडेविरोधात रोष व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही.”

“बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आमची ठाम मागणी आहे, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता

दरम्यान, बेस्टच्या महाव्यवस्थापक एस श्रीनिवास यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच बेस्टच्या भाडेवाढीचे सुतोवाच केले होते. तसा प्रस्तावही पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. मात्र पालिका प्रशासनाने त्यावर काहीही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता बेस्टने या भाडेवाढीला मंजूरी दिली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या बेस्टला वार्षिक ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ झाल्यास वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.