मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष झालं तरी अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. यावरून शिवसेनेचा ठाकरे गट १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातोय, त्याचबरोबर त्यांना जाब विचारणारं कुणी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत (२० जुलै रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आता महापालिकेवर १ जुलै रोजी विराट मोर्चा काढणार आहे, अशीही घोषणा उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती.
या मोर्चाची ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापलिकेत जो भ्रष्ट्राचार सुरू आहे त्याविरोधात आमचा हा मोर्चा असेल. आपण एक वर्ष झालं पाहत आहोत. मुंबईतला रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडीचा घोटाळा, वेंडिग मशीनचा घोटाळा यावर बोलण्यासाठी, हे सगळे प्रश्न मुंबईकरांसमोर आणण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेतल्या भ्रष्ट्राचाराला वाचा फोडण्यासाठी, तिथे सुरू असलेल्या घोटाळ्यांबद्दल जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.
हे ही वाचा >> मुंबई महापालिका कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, अधिकाऱ्यांना मारहाण, पोलीस कारवाईच्या तयारीत
आदित्य ठाकरे म्हणाले, अनधिकृत म्हणून जी शाखा महापालिकेने तोडली त्या शाखेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. त्या शाखेवर गद्दारांनी बुलडोझर चढवला. राज्यात कुठेही शिवाजी महाराजांचा फोटोवर अथवा बाळासाहेबांच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर त्यांच्या चाहत्यांकडून रिअॅक्शन येऊ शकते.