गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई महानगर पालिका निवडणुका यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. भाजपाकडून शिवसेनेविरोधात वरळीत हे शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जात असताना स्थानिक शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. गिरगावमधील दहीहंडी उत्सवात आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
आशिष शेलार यांची वरळीबाबत विधानं…
वरळीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या काही विधानांचा संदर्भ आहे. आशिष शेलार यांनी विधानभवनात बोलतानाच वरळीबाबत “आम्ही गड वगैरे काही मानत नाही, आदित्य ठाकरे स्वत: आमच्या मतांच्या जिवावर निवडून आले आहेत”, असं म्हणत या वादाला तोंड फोडलं. यानंतर सचिन अहिर यांनी देखील आशिष शेलार यांना खुलं आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवून जिंकून यायला सांगितलं आहे. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मला त्या बालिशपणात जायचं नाही”
वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी करून भाजपानं शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याबाबत विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकाराला बालिशपणा म्हटलं आहे. “मला आनंद आहे. त्यांनी येऊन वरळी बघावं. वरळी सगळ्यांना आवडायला लागलं आहे. वरळी ए-प्लस झालं आहे. तरीदेखील मी सांगितलं त्याप्रमाणे या बालिशपणात आम्ही जाणार नाही. ज्यांना कुणाला कुठेही हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथे करू द्या. आजचा दिवस कार्यकर्त्यांना आमनेसामने आणून वाद घालण्याचा नाही. लोक आनंद घेत आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आमचं ठरलंय…”, वरळी मतदारसंघाचा उल्लेख करत आशिष शेलारांचा शिवसेनेला सूचक शब्दांत टोला!
जांबोरी मैदानात सुशोभिकरण आणि दुरुस्ती केल्यानंतरही तिथे दहीहंडीचा उत्सव साजरा होण्यावर सचिन अहिर यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत आदित्य ठाकरेंनीही हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं आहे. “मला वाटतं स्थानिक नागरिकांनी याविरोधात काही पत्र देखील दिली आहेत. आपण जे काही करू, ते आनंदाने करू. उगीच कुणालातरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा झाला. यात मला जायचं नाही”, असं ते म्हणाले.