मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. पाऊस असतानाही शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. तुमच्या फाइल्स तयार केल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर तुमची दाखवणार, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“मुंबईत भगवं वादळ आलं आहे. मुंबई महापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार आहे,” असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
“मला विचारलं निवेदन देणार आहात का? मी म्हटलं चोरांना काय निवेदन द्यायचं. जी काही चोरी केली आहे, ती आमच्यासमोर आली आहे. तुमच्या फाइल्स बनवल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस येऊन तुमची जागा दाखवणार आहे. पुढची फाइल सही करताना लक्षात ठेवा. दिल्लीचे कितीही आदेश आले, तरी मुंबईला लुटू नका,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
“पाच कंत्राटदार मित्रांसाठी पाच पाकिटे बनवली. पाच विभागांतील रस्त्यांची काम पाच कंत्राटदारांना वाटून दिली. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा पाच हजार कोटींचं कंत्राट निघालं. पण, एकाही मित्राने कंत्रात न भरल्याने ते रद्द करण्यात आलं. नंतर एक हजार वाढवून सहा हजार कोटींना कंत्रात नेण्यात आलं. यावेळी ४० टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला. पहिल्यांदाच रस्ते कंत्राटदारासाठी १८ टक्के वाढवून दिले,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.