आजचा सुधारकमासिकाचे प्रकाशन बंद करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय

‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा स्पष्ट उद्देश समोर ठेवून गेली २७ वर्षे गंभीर व सखोल लिखाणातून वाचकांचे वैचारिक भरणपोषण करणाऱ्या ‘आजचा सुधारक’ या नियतकालिकाचे प्रकाशन बंद होत आहे. टपाल विभागाशी संबंधित काही तांत्रिक कारणांमुळे मासिकाच्या व्यवस्थापनाने एप्रिल महिन्यापासून अंकाचे प्रकाशन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मराठीतील विवेकवादी तत्त्ववेत्ते दि. य. देशपांडे यांनी एप्रिल, १९९० मध्ये हे मासिक सुरू केले. ‘नवा सुधारक’ या नावाने सुरू झालेल्या या मासिकाचे १९९० च्या डिसेंबरच्या अंकापासून ‘आजचा सुधारक’ असे नामकरण करण्यात आले. गोपाळ गणेश आगरकर यांच्या ‘सुधारक’ साप्ताहिकाचा नवा अवतार म्हणून मराठीतील वैचारिक विश्व ‘आ. सु.’कडे पाहत होते. देशपांडे यांच्यानंतर दिवाकर मोहनी, नंदा खरे, प्र. ब. कुलकर्णी, अनुराधा मोहनी, संजीवनी कुलकर्णी, प्रभाकर नानावटी यांनी या मासिकाच्या संपादनाची धुरा सांभाळली. जागतिकीकरण आणि नवहिंदुत्ववादाचा उदय होण्याच्या काळाला समांतर ‘आ. सु.’ची वाटचाल आहे. या काळात या मासिकाने विविध विषयांवर मूलगामी चर्चा घडवून आणली. जागतिकीकरण, नवहिंदुत्ववाद, स्त्री-पुरुष सहजीवन, धर्म, विज्ञान, तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य साहित्य, आस्तिकता-नास्तिकता आदी अनेक विषयांवरील लिखाण यातून प्रसिद्ध होत राहिले.

गेली २७ वर्षे मराठी वैचारिक विश्वातील महत्त्वाचे अंग राहिलेल्या ‘आ. सु.’ला गेल्या दोनेक वर्षांपासून टपाल विभागाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातून टपाल विभाग व मासिक व्यवस्थापन यांच्यात वाद होऊन ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेले आहे. त्यामुळे आधी नियतकालिक म्हणून निघणारे मासिक गेल्या काही काळात ग्रंथमाला म्हणूनही प्रसिद्ध होत होते. मात्र मासिकाच्या डाक खर्चात मिळणाऱ्या सवलतींवर आलेली बंधने, तसेच इतर व्यवस्थापकीय व आर्थिक अडचणींमुळे शेवटी मासिकाचे प्रकाशन थांबविण्याचा निर्णय ‘आजचा सुधारक’च्या व्यवस्थापनाने जाहीर केला आहे. त्यामुळे आता मासिकाचे छापील तसेच ई-अंक प्रकाशनही कायमस्वरूपी बंद होणार आहे. मार्च, २०१७ चा अंक हा ‘आ. सु.’चा शेवटचा अंक असून त्याचे प्रकाशन १० जून रोजी नागपूर येथे करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

टपाल विभागाशी संदर्भात अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे मासिकाचे प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र येत्या काळात वाचकांचा सक्रिय पाठिंबा मिळाल्यास नव्या स्वरूपात काही सुरू करता येईल का, याचाही विचार आम्ही करीत आहोत. आजवरच्या ‘आ. सु.’च्या अंकांचे बांधीव खंड काढणे, तसेच त्यांचे डिजिटलायजेशन करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.   रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, विद्यमान संपादक, ‘आजचा सुधारक