मुंबई : विलेपार्ले जुहू रोड, इंदिरा नगर येथील नाल्यालगतच्या खचलेल्या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. तसेच सुरक्षेची उपाययोजना म्हणून ३१ झोपड्या पाडून टाकण्यात आल्या होत्या. या झोपडपट्टीवासीयांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाजवळील नाल्यात २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सात झोपड्या खचल्या. दुर्घटनेनंतर सुमारे १७० झोपड्यांमधील रहिवाशांना सन्यास आश्रम महानगरपालिका शाळा व टाटा कम्पाऊंड महानगरपालिका शाळा तसेच विलेपार्ले जैन श्रावक संघ येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यांना दोन वेळचे जेवण दिले जात होते. मात्र आता जेवण बंद केल्यामुळे या रहिवाशांच्या पोटापाण्याचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मेट्रो दोनच्या कामासाठी खोदकाम करताना झोपड्याना तडा गेल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तडा गेलेल्या २२ घरांची नोंद तहसीलदार कार्यालयाने केली आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आणखी ८ घरे तोडली. मात्र त्यांची नोंद घेतलेली नाही. महानगरपालिका आणि एमएमआरडीएने या दुर्घटनेची संयुक्त जबाबदारी घेऊन या कुटुंबांचे पुनर्वसन करावे अशी मागणी पक्षाने केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र दिले असून त्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.