शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. यानंतर आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’ येथे ही बैठक पार पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

हेही वाचा- मोठी बातमी: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी

येत्या काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे का? असं विचारलं असता अरविंद केजरीवाल म्हणाले, ” देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली.”

हेही वाचा- येत्या दोन दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होणार? २० आमदारांबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान!

“पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू… आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत,” असा टोला अरविंद केजरीवालांनी भाजपाचं नाव न घेता लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam adami party and thackeray group alliance in maharashtra uddhav thackeray aravind kejriwal meet in mumbai rmm