मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसचा ताफा कमी झाल्यामुळे बेस्टला अनेक लांब पल्ल्याचे मार्ग बंद करावे लागले आहेत. नादुरूस्त बस धावणे, छोट्या बस चालवणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास असह्य होत आहे. परिणामी, बेस्टचा ताफा ६ हजारापर्यंत वाढवण्याची मागणी ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’च्यावतीने बेस्ट दिनाच्या पार्श्वभ़ूमीवर केली आहे.
बेस्टच्या विस्ताराच्या २०१९ सालापासून चर्चा होत आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बेस्टकडे २०१० मध्ये ४,३८५ बसचा ताफा होता. मात्र, जुलै २०२४ मध्ये हा ताफा ३,१५८ पर्यंत कमी झाला असून त्यापैकी फक्त १,०७२ स्वमालकीच्या बस आहेत. येत्या काही वर्षात स्वमालकीच्या बसचा ताफा पूर्णपणे संपुष्टात येईल. बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आहे. त्यामुळे बेस्टचा ताफा ६ हजारांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे, असा सूर ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’च्यावतीने धरला आहे. काही वर्षापूर्वी बेस्ट ही भारतातील एक उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा होती. मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट व्यवस्थापनाने बेस्ट सेवा कशी मोडकळीस आणता येते हे दाखवून देत खासगी कंत्राटदारांचे अविश्वसनीय आणि असुरक्षित जाळे तयार करून प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करण्यास बस थांब्यावर ताटकाळत सोडले आहे. असे आमची मुंबई आमची बेस्ट या संघटनेच्या वतीने संघटनेचे समन्वयक विद्याधर दाते यांनी सांगितले.
हेही वाचा : १२ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
देशातील सार्वजनिक वाहतुकीपेक्षा मुंबईतील बेस्टची वाहतूक उत्तम आहे. एकीकडे मेट्रोसाठी वेगळा न्याय आणि बेस्टला वेगळा न्याय दिला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी बेस्ट जगवली पाहिजे. त्यासाठी जनआंदोलन केले पाहिजे, असे प्रा. तपती मुखोपाध्याय म्हणाल्या.