जनतेच्या मनाला भावतील असे मुद्दे उपस्थित करीत निवडणुकीच्या राजकारणात पहिल्याच फटक्यात चांगले यश मिळणाऱ्या अलीकडच्या काळातील राजकीय पक्षांमध्ये ‘आम आदमी पार्टी’ची भर पडली आहे. भ्रष्टाचार तसेच पाणी आणि वीज हे सामान्यांशी संबंधित मुद्दे हाती घेऊन दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी सर्वानाच धक्का दिला आहे.
वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आम आदमी पार्टीला सत्ता मिळवण्याइतपत यश मिळाले नसले, तरी गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा सफाया करतानाच भाजपच्या मतांवरही ‘आम आदमी’ने डल्ला मारला.
पहिल्याच फटक्यात निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्यांमध्ये १९८०च्या दशकापासून आतापर्यंत चार राजकीय पक्षांना यश आले आहे. तेलगू अस्मितेच्या मुद्दय़ावर (तेलगू बिड्डा) एन. टी. रामाराव यांनी १९८२ मध्ये तेलगू देशम या राजकीय पक्षाची स्थापना केली. अवघ्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील २९४ पैकी २०२ जागा जिंकून रामाराव यांनी काँग्रेसचा धुव्वा उडविला होता. पुढे काँग्रेसने रामाराव यांचे सरकार पाडण्याचे उद्योग केले. पण दोन वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा आंध्रच्या जनतेने रामाराव यांच्यावर विश्वास दाखविला. आसाममध्ये १९८० नंतर बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्दय़ावर मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात विद्यार्थी संघटनांचा पुढाकार होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम शांतता करार केला. आंदोलनात सक्रिय असलेल्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आसाम गण परिषद या राजकीय पक्षाची स्थापना केली. अवघ्या वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखाली आसाम गण परिषदेला सत्ता मिळाली होती. पुढे आसाम गण परिषदेची शकले झाली आणि महंतो यांनाच पदावरून दूर करण्यात आले. पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढविण्याकरिता या पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातही पहिल्याच फटक्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नसली तरी मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये या पक्षाच्या उमेदवारांना सर्वत्रच लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. लोकसभेनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणीत मनसेने आपली ताकद दाखवून दिली. मनसेने शिवसेनेला चांगलाच झटका दिला होता. आंध्र प्रदेशमध्ये २००८ मध्ये स्थापन झालेल्या चित्रपट अभिनेते चिंरजिवी यांच्या प्रजाराज्यम पक्षाने आपली चुणूक दाखवून दिली होती. २००९च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १८ उमेदवार निवडून आले असले, तरी या पक्षाला एकूण मतांच्या १६ टक्के मते मिळाली होती.
पहिल्याच फटक्यात ‘आप’ची छाप!
जनतेच्या मनाला भावतील असे मुद्दे उपस्थित करीत निवडणुकीच्या राजकारणात पहिल्याच फटक्यात चांगले यश मिळणाऱ्या अलीकडच्या काळातील
First published on: 09-12-2013 at 02:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap successful in first term