मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य शिक्षण मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल अलीकडेच ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. आरक्षित कोट्याअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पनाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु सध्या सदर सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या ‘आपले सरकार – महाऑनलाइन’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) या सरकारी संकतेस्थळावरील तांत्रिक गोंधळाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित महाविद्यालयीन प्रवेशाची संधी हुकते का? अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आपले सरकार – महाऑनलाइन’ या सरकारी संकतेस्थळाचा सर्व्हर अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड होण्यास विलंब होत आहे. वेळेत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांची संबंधित महाविद्यालयात प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर ‘म्हाडा’ने स्वत:च्या संकेतस्थळावर घरांच्या सोडतीचा अर्ज भरण्यासाठी अधिवास प्रमाणपत्रासारखी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना प्राप्त व्हावी यासाठी थेट ‘आपले सरकार – महाऑनलाइन’च्या संकेतस्थळाची लिंक उपलब्ध केल्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>>मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विविध प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी ‘महाऑनलाइन’ या संकेतस्थळावर दररोज लाखो अर्ज येत असतात. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे तात्काळ हवी असतात. त्यामुळे एकाच वेळी विद्यार्थ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. कमी वेळेत असंख्य विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध करून देताना यंत्रणेवर ताण येतो. विद्यार्थ्यांनी एक वर्ष आधीच ही प्रमाणपत्रे प्राप्त करावीत. विद्यार्थ्यांच्या तात्काळ मागणीमुळे काही प्रमाणात तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. हा तांत्रिक गोंधळ सोडविण्यासाठी आमचे पथक काम करीत आहे. यंत्रणा हळूहळू पूर्ववत होत आहे’, असे ‘महाऑनलाइन’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.