शासकीय दूध योजनेमार्फत बृहन्मुंबई व ग्रामीण योजनेमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या आरेच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून नवे दर सोमवारपासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर दूध खरेदी आणि वितरकांच्या कमिशनमध्येही वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महानंद, गोकुळ, अमूल या कंपन्यांनी दुधाच्या विक्री दरात ऑगस्टमध्ये वाढ केली होती. त्यानंतर खुल्या बाजारातील दुधाच्या दरात होणाऱ्या वाढीप्रमाणे शासकीय योजनेतील दूधाच्या खरेदी, विक्री दरात तसेच संघ, संस्थांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने  कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती.
या समितीने दिलेल्या अहवालानुसार आरे मार्फत विक्री करण्यात येणाऱ्या पिशवीबंद गायीच्या दोण्ड आणि म्हैसीच्या क्रीम दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गायीचे टोण्ड दूध आता ३३ रुपये लिटर तर म्हशीचे दूध ४२ रुपये प्रतिलिटर असेल. तर ग्रामीण योजनेच्या माध्यमातून वितरित होणाऱ्या दूधासाठी हाच दर अनुक्रमे ३२ आणि ४१ रूपये प्रतिलिटर असेल. त्याचप्रमाणे दुधाच्या खरेदी दरातही वाढ करण्यात आली आहे.

Story img Loader