२७०० झाडे तोडण्यास हरित लवादाचा हिरवा कंदील, कुलाबा-सीप्झ मेट्रो-३ चा मार्ग निर्वेध

कुलाबा-सीप्झ भुयारी मेट्रोच्या आरे वसाहतीमधील प्रस्तावित कारशेडला गुरुवारी हरित लवादाच्या मुख्यपीठाने हिरवा कंदील दाखविला. लवादाच्या आदेशानंतर ‘वनशक्ती’ संस्थेने याचिका मागे घेतल्याने मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशनचा (एमएमआरसी) मार्ग मोकळा झाला आहे.

सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि ३३.५ किलोमीटर लांबीच्या आणि पूर्णत: भुयारी असलेल्या कुलाबा-सीप्झ मेट्रो-३चे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र मेट्रो कारशेड उभारण्यावरून  तीन वर्षांपासून पेच निर्माण झाला  होता.

या कारशेडसाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे सांगत ‘वनशक्ती’ या पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेने हरित लवादाकडे २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. आरे वसाहतीत मोठय़ा प्रमाणात झाडे असल्याने हा भाग वन म्हणून वा पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी त्यांची मागणी होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान लवादाच्या पुणे पीठाने ‘आरे’त वृक्षतोडीस मनाई करतानाच तिथे डेब्रिज वा भराव टाकण्यावरही मेट्रो रेले कॉर्पोरेशनला अंतरिम बंदी घातली होती. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने मेट्रो कारशेडची जागा वगळून अन्य भाग पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून जाहीर केला असून राज्य सरकारनेही या जागेत कोणतेही वन नसून ती जागा सरकारी मालकीचीच असल्याचा दावा केला होता.

लवादाच्या अंतरिम आदेशामुळे मेट्रो कारशेडचे काम काही महिने ठप्प होते. लवादाच्या निर्णयाविरोधात मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने हरित लवादच्या मुख्य पीठास दिले होते. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लवादाने ‘वनशक्ती’चे आक्षेप नाकारत याचिका फेटाळण्याचे संकेत दिले. त्या वेळी लवादाच्या सूचनेनुसार याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली.

वनसंपदा धोक्यात..

या कारशेडसाठी सरकारने ‘आरे’मध्ये ३० हेक्टर जमीन दिली आहे. या जमिनीवर असलेली तब्बल २७०० झाडे आता या कारशेडसाठी तोडली जाणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सर्व अडथळे आता दूर झाले असून आता कारडेपो आणि पर्यायाने प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यास मदत होईल.    – अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी