मुंबई : मेट्रो ३ कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींकडून आरे वाचवा आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता आरे पिकनिक पॉईंट येथे आरे कारशेड आणि सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आरेतच कारशेड करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमी, आरेवासीय आणि मुंबईकरांनी पुन्हा आरे वाचवाची हाक दिली आहे. त्यानुसार मागील रविवारी आरेत पिकनिक पॉईंट येथे दोन वर्षाच्या काळानंतर मोठे आंदोलन करण्यात आले होते. आरे कारशेडला विरोध असतानाही राज्य सरकार आरेवर ठाम असल्याने आरे वाचवा आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे. त्यानंतर यापुढे प्रत्येक रविवारी असे आंदोलन होणार आहे.
कांजूरमार्ग कारशेडसाठी तरी पुढे या
मेट्रोला, विकासाला आम्ही विरोध करत असल्याचा आरोप आमच्यावर होतोय. पण आमचा मेट्रोला कधीही विरोध नाही आणि नव्हता. आमचा विरोध पर्यावरणाचा ऱ्हास करून होणाऱ्या विकासाला आहे. त्यामुळेच आरेत कारशेड न करता कांजूरमार्ग मध्ये कारशेड करावी अशी आमची भूमिका असल्याचेही संजीव वल्सन यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्प आणखी मजबूत व्हावा असे आम्हाला वाटते. त्यामुळेच कांजूरमार्ग येथे एकात्मिक कारशेड प्रकल्प होणे गरजेचे आहे. हा प्रकल्प झाल्यास एकाच ठिकाणी चार कारशेड होतील. यामुळे वेळ, पैसा आणि जागेची बचत होईल, असे वल्सन यांनी सांगितले.