मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील १२.५ किमीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. १० स्थानकांचा समावेश असलेल्या या १२.५ किमीच्या मार्गिकेदरम्यान अर्थात आरे – बीकेसीदरम्यान दररोज मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. या मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांची वारंवारता साडेसहा मिनिटे असणार आहे. पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकेवरून दिवसाला साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमएमआरसी’च्या ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याच्या संचलनासाठी आतापर्यंत अनेक तारखा देण्यात आल्या होत्या. पण काम पूर्ण होत नसल्याने हे मुहूर्त टळले. आता मात्र ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील १२.५ किमीच्या आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक असे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रमाणपत्र येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून आरे – बीकेसी मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आरे – बीकेसी टप्पा सुरू झाल्यास मुंबईकरांना प्रवासाचा एक सुकर आणि अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. आरे, मरोळ, अंधेरी एमआयडीसी, सीप्झ आणि बीकेसी अशा आर्थिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या परिसराशी हा टप्पा जोडलेला आहे. या परिसरात दररोज नोकरीच्यानिमित्ताने लाखो नागरिक ये-जा करीत असतात. हा परिसर कुठेही थेट उपनगरीय रेल्वेशी जोडलेले नाही. रस्ते प्रवास अर्थात बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा वा स्वत:चे वाहन याद्वारेच या परिसरात येता – जाता येते. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवासासाठी वेळ, पैसा आणि इंधन वाया घालावे लागते. पण आरे – बीकेसी टप्पा कार्यान्वित झाल्यास या सर्व त्रासातून प्रवाशांची सुटका होईल, असा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे. मरोळ, अंधेरी एमआयडीसी, सीप्झ आणि बीकेसी येथे काही मिनिटांत पोहचणे शक्य होणार आहे. त्यामुळे या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. याअनुषंगाने आरे – बीकेसी या मार्गिकेवरून दिवसाला अंदाजे साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : उत्पन्न वाढीसाठी चालक-वाहकांना प्रोत्साहन भत्ता देणार, एसटी महामंडळाचा निर्णय

आरे – कफ परेड अशा संपूर्ण मार्गिकेवरील अपेक्षित प्रवासी संख्या दिवसाला अंदाजे १७ लाख अशी आहे. तर आरे – बीकेसी दरम्यान दिवसाला साडेसहा लाख प्रवासी संख्या अपेक्षित आहे. सुरुवातीला या मार्गिकेवरून अपेक्षित प्रवासी संख्या गाठता येणार नाही. पण संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर ती इतर मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे. त्यानंतर अपेक्षित प्रवासी संख्या गाठता येईल, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मेट्रो ३ साठी ३१ गाड्यांची बांधणी करण्यात येत असून यापैकी अंदाजे १३ गाड्या आरे कारशेडमध्ये सज्ज आहेत. मात्र यापैकी ९ गाड्या आरे – बीकेसीदरम्यान धावणार आहेत. प्रत्येक साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो गाडी धावणार आहे. तर १२.५ किमी मार्गिकेवर दिवसाला मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले. त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांची रचना ताशी ८५ किमी वेग अशी आहे. मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यावर ताशी ३५ किमी वेगाने मेट्रो धावणार आहे.

सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भुयारी मेट्रो ३ ची सेवा

लोकार्पणानंतर आरे – बीकेसी टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून त्यानंतर मुंबईकरांना या मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे. एमएमआरसीच्या वेळापत्रकानुसार आरे – बीकेसी दरम्यान सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो ३ ची सेवा सुरू असणार आहे. तर रविवार सकाळी ८.३० ते रात्री १०.३० दरम्यान मेट्रो ३ ची सेवा पहिल्या टप्प्यादरम्यान सुरू राहणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई: दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

१० महिला करणार मेट्रो ३ चे सारथ्य

मुंबईत पहिली मेट्रो वर्सोवा – घाटकोपरदरम्यान धावली. तेव्हा पहिल्या मेट्रोचे सारथ्य महिला मेट्रो पायलटने केले होते. तर मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गिकेवरून पहिली मेट्रो चालविणारी मेट्रो पायलटही महिलाच होती. तर आता तिसरी आणि मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार असून तिचे सारथ्य महिला मेट्रो पायलट करण्याची शक्यता आहे. आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्यादरम्यानच्या मेट्रोच्या ९६ फेऱ्यांसाठी एमएमआरसीने ४८ मेट्रो पायलटची नियुक्ती केली असून यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarey to bkc metro line 3 daily 96 rounds of metro and four lakh passengers expected per day mumbai print news css