मुंबई : ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विविध विभागातील सात पुरस्कार जिंकून सर्वोत्तम ठरलेल्या ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटासाठी सहाय्यक संकलक म्हणून काम केलेल्या मुंबईच्या आशिष डिमेलोचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटासाठी ऑस्कर पुरस्कार भारताकडे आल्याचा आनंद सगळीकडे साजरा होतो आहे. त्यात आशिषने मिळवलेल्या यशाची भर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिस्तभंगाच्या कारवाईचे प्रकरण : सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा

‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या मानाच्या पुरस्कारासह सर्वोत्तम संकलन विभागातही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे संकलक पॉल रॉजर्स यांच्याबरोबर आशिष डिमेलो आणि झेकुन माओ या दोघांनी सहाय्यक संकलक म्हणून काम केले आहे. खुद्द पॉल यांनी पुरस्कार स्वीकारताना आपल्या दोन सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मूळचा मुंबईकर असलेल्या आशिषने झेवियर्स महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओजवळच्या परिसरात वास्तव्याला असलेल्या आशिषने ‘मर्दानी’ या राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाबरोबरच काही जाहिरातींसाठी सहाय्यक संकलक म्हणून काम केले आहे. त्याने २०१५ मध्ये लॉस एंजेलिस येथील ‘अमेरिकन फिल्म इन्सिट्यूटमध्ये’ संकलन प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

हेही वाचा >>> अर्थसंकल्पाचा कृती अहवाल मांडणार, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तेथेच सहाय्यक संकलक म्हणून त्याने काम सुरू केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेल्या अनेक लघुपटांचे संकलन केलेल्या आशिषला ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटासाठी सहाय्यक संकलक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. करोनापूर्वी चित्रीकरण पूर्ण झालेल्या या चित्रपटाच्या संकलनाचे काम मात्र करोना काळात अधिक काळजीपूर्वक आणि सगळ्यांपासून दूर राहून करावे लागले, असे आशिषने सांगितले. या चित्रपटासाठी आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. ज्या पध्दतीने या चित्रपटाला प्रेक्षकांचे, समीक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि आता अकॅडमीनेही पुरस्काराची मोहोर उमटवली ते पाहून घेतलेली मेहनत सार्थकी लागली, अशा शब्दांत आशिषने आपला आनंद व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aashish dmello the indian behind oscar winner movie everything everywhere all at once mumbai print news zws