मुंबई : लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने अभिषेक आणि अभिनंदन या लोढा बंधूना सोमवारी दिला. हा वाद दोन भावांमधील असल्याने तो शांततेने सोडवणे शक्य आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, सल्ल्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले.

अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने काही दिवसापूर्वी अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केला होता. त्यात, लोढा या व्यापारचिन्हाचे स्वामित्त्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे, लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांनी केली होती.

न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, हा वाद दोन भावांमधील असल्याचे दिसते, असे न्यायलयाने म्हटले. तसेच, दोन भावांमध्ये लोढा या नावावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले आहेत का किंवा पक्षकार मध्यस्थाद्वारे हा वाद सोवडवण्यास तयार आहेत का ? अशी विचारणा मॅक्रोटेक डेव्हलपर्ससह अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांना केली. त्याचवेळी. दाव्याशी संबंधित पक्षकार मध्यस्थाद्वारे हा वाद सोडवण्यासाठी तयार असल्यास त्यांनी मंगळवारी तसे स्पष्ट करावे. त्यानंतर, माजी मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली जाईल. तसेच, ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांना सांगितले जाईल, असेही न्यायमूर्ती डॉक्टर यांनी स्पष्ट केले.

त्यावर, मॅक्रोटेक डेव्हलपर्स ही कंपनी लोढा या व्यापारचिन्हाची नोंदणीकृत मालक असल्याचे आणि म्हणूनच या प्रकरणी ती पीडित पक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि, हा वाद दोन भावांमधील असल्याचे दिसून येत असल्याचा पुनरूच्चार न्यायमूर्ती डॉक्टर यांनी केला. तसेच, त्यांच्यामधील हा वाद मिटला, तर बाकी सगळ्या मुद्यांनाही पूर्णविराम मिळणार नाही का ? असा प्रश्न करून लोढा बंधुंमधील वादावर तोडगा काढण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील, असे नमूद केले.

प्रकरण काय ? मॅक्रोटेक डेव्हलपर्सने याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचा दावा केला आहे. तसेच, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेली ही बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी होती आणि लोढा या नावाअंतर्गत कंपनीने निवासी व व्यावसायिक बांधकामे केल्याचे म्हटले आहे. आपल्या कंपनीकडे ‘लोढा हे व्यापारचिन्ह आणि इतर विविध नोंदणीकृत व्यापारचिन्हांची मालकी आहे. कंपनीच्या याचिकेनुसार, लोढा समुहातील सर्व कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा अंतर्गत करार २०१५ पर्यंत अस्तित्त्वात होता. तथापि, २०१५ मध्ये, अभिनंदन लोढा हे लोढा समुहापासून वेगळे होतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीला मार्च २०१७ मध्ये आणि नंतर २०२३ मध्ये कौटुंबिक सामंजस्य कराराद्वारे वेगळे होण्याच्या अटी देखील निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. परंतु, २०२३ मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना आपण बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.

Story img Loader