ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहीसर येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर ही घटना घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना माहिती दिली. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. आजचा दिवस आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमचे सहकारी अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला”, अशी माहिती माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी दिली.

“दहिसरमध्ये अनंत गिते, विनोद घोसाळकर आणि मी एका कार्यक्रमात होतो. तेव्हा काही कार्यकर्ते आमच्याकडे धावत आले आणि आम्हाला गोळीबाराची माहिती दिली. गोळीबाराच्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष नव्हतो. तिथे दुसरे कार्यकर्ते होते. त्यांना आता रुग्णालयात दाखल केलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, हा गोळीबार कोणी केला अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु, याबाबत माहिती देताना बाळकृष्ण ब्रीद म्हणाले, मॉरिस नावाचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक व्यक्ती आहे. त्यानेच हा गोळीबार केला आहे. त्यावेळी दोन लोक होते.”

हेही वाचा >> VIDEO : अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा थरार समोर, कथित हल्लेखोराने स्वतःच्याच फेसबूकवरून केलं होतं लाईव्ह

“अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांना दोन गोळ्या लागल्या असल्याचं डॉक्टरांकडून समजलं आहे. परंतु प्रकृती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात हा चिंताजनक विषय आहे”, असंही ते म्हणाले.

“एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे”, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

उल्हासनगरातही घडला होता थरार

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात आमदार गायकवाड यांनी आणि त्यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे यांनी १० गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबार प्रकरणी महेश गायकवाड यांचे समर्थक चैनू जाधव यांनी आमदार गायकवाड, हर्षल नाना केणे, आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव, नागेश बढेकर, संदीप सरवणकर, विक्की गणात्रा आणि इतर सात साथीदारांविरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी केली. पोलिसांनी या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek ghosalkar a former corporator of the thackeray group was shot at and is in critical condition sgk
Show comments