मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या खूनप्रकरणी शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. घोसाळकर यांचा खून करणाऱ्या मॉरिस नरोन्हाला शिंदे गटात सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, असा आरोप करीत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर हे ठाकरे गटातील गँगवॉर असल्याचे प्रत्युत्तर उद्योगमंत्री व शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी दिले. ही घटना गंभीर असून त्याचे राजकारण करु नये, असे नमूद करीत विरोधक एखाद्या गाडीखाली श्वान आला, तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मॉरिसविरोधात काही गुन्हे दाखल झाले होते व तो तुरुंगातून सुटून आला होता. त्याचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबरोबर बरीच वर्षे संबंध असल्याचे दिसून आले आहे. त्याने घोसाळकर यांचा पूर्ववैमनस्यातून खून केल्यावर शिंदे-ठाकरे गटातील वाद उफाळून आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी व आदित्य ठाकरे, खासदार राऊत यांनी घोसाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिषेक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

हेही वाचा >>>पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची मोठी भरती; चार माध्यमांसाठी १३४२ शिक्षकांची पदभरती

घोसाळकर यांच्यावर गोळीबाराच्या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे टीकास्त्र सोडत विरोधकांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. राज्यात गुन्हेगारी घटना घडत असताना फडणवीस यांचे ‘वर्षां’ बंगल्यावर आणि मंत्रालयात गुंडांबरोबर ‘चाय पे’ चर्चा सुरू आहे. फडणवीस हे ठाकरे गटातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करीत असून त्यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष नाही आणि गुंडांवर वचक नाही. मॉरिस हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटला होता. मॉरिसला शिंदे गटात सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, असा आरोप राऊत यांनी केला.

 त्याला शिंदे गटातील नेते व मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले असून मॉरिसला ठाकरे गटानेच मोठे केले होते आणि हे ठाकरे गटातील गँगवॉर असल्याचा आरोप केला आहे. ही घटना दुर्देवी आहे. विरोधी किंवा कोणत्याही पक्षातील नेत्याबरोबर अशी घटना घडू नये. पण विरोधकांकडून राजकारण केले जात असून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असे नमूद करुन सामंत यांनी मॉरिसचे कौतुक करणाऱ्या बातम्या ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रात छापून आल्याचे सांगितले व त्याची कात्रणे ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दाखविली. घोसाळकर आणि नेरोन्हा यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, हे कोणी सुचविले होते, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा कुटिल डाव असून ते सहन करणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.

हेही वाचा >>>रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा

गाडीखाली श्वान आला, तरी राजीनामा मागतील

 घोसाळकर यांच्यावर वैयक्तिक वैमनस्यातून गोळीबार झाला असून एका तरुण नेत्याचे अशा पद्धतीने निधन होणे, ही अतिशय गंभीर व दु:खद घटना असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असून हे योग्य नाही. घटनेमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून येत असून त्याची खात्री पटल्यावर उघड केली जातील. वैयक्तिक वैमनस्यातून घडलेल्या घटनेवरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका करणे योग्य नाही. पण सध्या विरोधकांची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आल्यावर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला, तरी आश्चर्य वाटू नये, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

ही घटना पाहता बंदूक, पिस्तुलाचे परवाने देताना अजून कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याप्रकरणात पोलिसांचे परवाने होते की नाहीत, आदी मुद्दय़ांचाही शासन विचार करणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, तर गुंडाराज सुरू आहे, गुन्हेगारांना राजाश्रय देणारे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. दादर येथील टिळक भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा आमदार उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार करतो, जळगाव, यवतमाळमध्येही गोळीबाराच्या घटना घडल्या आणि आता मुंबईत दिवसा ढवळय़ा माजी नगरसेवकाची हत्या केली जाते, महाराष्ट्रासाठी ही अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek ghosalkar murder case accusation counter accusation in thackeray shinde group amy
Show comments