मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा (४०) याला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा परवाना मिश्राच्या नावे असल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी अमरेंद्र मिश्राने पिस्तुलाचा परवाना उत्तर प्रदेशातून काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडील पिस्तुलाची नोंदणी मुंबईत करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपी मॉरिस नरोन्हा याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दहिसर येथील व्यापारी श्रीलालचंद पाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरण: ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
साडी वाटप कार्यक्रमाच्या नावाखाली मॉरिसने घोसाळकर यांना आय.सी. कॉलनीतील प्रभू उद्योग भवन येथील आपल्या दुमजली कार्यालयात बोलावले होते. फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिसने घोसाळकरांवर पाच गोळय़ा झाडल्या. त्यातील चार गोळय़ा घोसाळकर यांना लागल्या. शवविच्छेदनात एक गोळी घोसाळकर यांच्या शरीरात सापडली तर उर्वरित तीन गोळय़ा शरीरातून आरपार गेल्याचे आढळले. घोसाळकरांवर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर गोळी मारून आत्महत्या केली. हत्या झाली त्यावेळी मॉरिस आणि घोसाळकर दोघेच कार्यालयात होते. सीसी टीव्ही चित्रणाच्या तपासणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांचा जबाब नोंदवला आहे.
मॉरिसची गुन्हेगारी पार्श्वभूमी..
आरोपी मॉरिसवर बलात्कार, अश्लील संभाषण आणि चोरी असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील अश्लील संभाषणाच्या गुन्ह्यावरून अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पण तो त्यांनी मिटवला होता. मात्र, मॉरिसने घोसाळकर यांना साडी वितरण कार्यक्रमाला बोलावून त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या.
हेही वाचा >>>रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा
मॉरिसने वापरलेले पिस्तुल त्याचा सुरक्षा रक्षक अमरेंद्र मिश्रा याचे आहे. त्यामुळे मिश्राला अटक करण्यात आली आहे. मिश्राने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फूलपूरमधून २०१३ मध्ये पिस्तुलाचा परवाना घेतला होता. मिश्रा तीन ते चार महिन्यापासून मॉरिसकडे अंगरक्षक म्हणून काम करत आहे. नियमानुसार मिश्राने मुंबईतही पिस्तुलाची नोंदणी करणे आवश्यक होते, असे पोलिसांनी सांगितले.
पहिला प्रयत्न फसला
घोसाळकर यांच्यावर गोळय़ा झाडल्यानंतर ते दरवाजाच्या दिशेने धावले. त्यावेळी मॉरिसने त्यांच्यावर पुन्हा पिस्तूल रोखले, पण ते खाली कोसळल्याने त्याने विचार बदलला आणि स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडली. मात्र ती चुकली. त्यामुळे मॉरिस पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याने पिस्तुलात गोळय़ा भरल्या आणि स्वत:वर गोळी झाडली.