अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या स्वयंघोषित नेत्यानी गुरुवारी म्हणजेच ८ फेब्रुवारीला गोळ्या झाडून हत्या केली. मॉरिसने आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासह फेसबुक लाईव्ह केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मॉरिसच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मॉरिस हा परफेक्ट व्यक्ती नसेल पण सोशल मीडियावर त्याची प्रतिमा तशी रंगवली जाते आहे असं मॉरिसची पत्नी सरीना नोरोन्हाने म्हटलं आहे. तसंच जे काही झालं त्याचा मला आयुष्यभरासाठी पश्चात्ताप असेल असंही सरीना नोरोन्हाने म्हटलं आहे. माझ्या मुलीने वडील गमावले म्हणून मी जितकी दुःखी आहे तितकंच वाईट मला अभिषेक घोसाळकर यांच्या मुलांविषयीही वाटतं आहे असंही सरीनाने म्हटलं आहे. मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत सरीनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच मॉरिसबद्दल एक महत्त्वाचं विधान केलंय.
काय म्हटलं आहे मॉरिसच्या पत्नीने?
मला प्रकर्षाने एक गोष्ट मॉरिसविषयी सांगायची असेल तर ती एकच आहे की एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की त्याचे परिणाम इतके वेदनादायी असतील. जी घटना घडली त्यासाठी मॉरिसचे शत्रूही जबाबदार आहेत. मॉरिसवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी केसेस राजकीय हेतूने प्रेरित होत्या. मॉरिसच्या शत्रूंनी षडयंत्र रचून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवलं होतं. ही गोष्ट वगळली तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल नव्हता.
मॉरिस तणावाखाली वावरत होता
मॉरिस हा तुरुंगातून सुटल्यापासून दबावाखाली होता. मॉरिसचं सामाजिक काम आणि बॅनर याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. त्याच्या शत्रूंनी अमेरिकेन दुतावासाकडे त्याच्याबाबत पत्रं पाठवली होती.मॉरिस हा गुन्हेगार असल्याचे लिहले होते. परिणामी अमेरिकन दुतावासाकडून मॉरिसला समन्स पाठवण्यात आले होते. मॉरिसला जामीन मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेला जायचे होते. मात्र, तुझ्यावरील गुन्हेगारी प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय तुला अमेरिकेला जाता येणार नाही, असे दुतावासाकडून सांगण्यात आले होते. मॉरिसला त्याच्या उपजीविकेसाठीही पैसे कमावता येऊ नयेत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मी मॉरिसला इतक्या तणावात कधीच पाहिले नव्हते. मॉरिस बहुतेकवेळा मला त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींविषयी सांगायचा. त्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवायची भाषा मॉरिस अनेकदा करायचा. पण गोष्टी या थराला जातील, असे मला कधीच वाटले नव्हते. तो झुकला नाही, असे सरीना यांनी म्हटले.
हे पण वाचा- अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव पाहून वडिलांनी फोडला टाहो! पत्नी आणि मुलीचं रडणं मन हेलावून टाकणारं
गोळीबाराची ती घटना कशी समजली?
सरीनाने सांगितले की, मी ऑफिसमध्ये असताना मला आईचा फोन आला. तिने मला अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले. त्यावर मी काही बोलले नाही. थोड्यावेळाने मला एका मित्राने फोन करुन सांगितले की, अभिषेकवर गोळीबार करणारा मॉरिस होता. तेव्हा मला विश्वासच बसला नाही. त्यानंतर आणखी एकाने मला मॉरिसनेच अभिषेकवर गोळ्या झाडल्याचे सांगितले. ते ऐकून मला खूपच धक्का बसला. तेव्हा माझी मुलगी एकटीच घरी होती. मी आईला तातडीने तिच्याकडे पाठवले. माझ्या मुलीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या घटनेबद्दल कळाले. सोशल मीडियावर मॉरिस गुंड असल्याचे सांगितले जात आहे. पण हे खरे नाही. माझ्या मुलीला या सगळ्यामुळे खूप त्रास झाला. तिने अन्नपाणी सोडले आहे, आपले वडील परत येतील, अशी आशा तिला वाटते.