मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी अनेकदा निविदा काढूनही विकासक मिळत नसल्याने अखेर निविदा रद्द कराव्या आणि अटी-शर्तींमध्ये बदल करून नव्याने निविदा काढण्याचे निर्देश राज्य सरकारने म्हाडाला दिले आहेत. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने ६३५ चौरस फुटांऐवजी ६२० चौरस फुटांची घेर देण्याच्या अटीसह निविदेत आवश्यक ते बदल करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या आठवड्याभरात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. समितीच्य मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र त्याचवेळी ६२० चौरस फुटांची घरे देण्याच्या निर्णयानंतर मुंबई मंडळाने अभ्युदयनगरवासियांना आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता अभ्युदयनगरवासियांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येणार आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून निविदा प्रक्रिया
रखडलेला अभ्युदयनगरचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. त्यानुसार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची (सी अँड डी)अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पण या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे निविदेला अनेक वेळा मुदतवाढ देण्याची, फेरनिविदा काढण्याची नामुष्की मंडळावर आली. पण यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. तर राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रकरणी आता काय निर्णय घ्यावा अशी विचारणा मुंबई मंडळाकडून करण्यात आली. त्याचवेळी ४९९ चौरस फुटांची घरे देऊन प्रकल्प व्यवहार्य ठरत असताना ६३५ चौरस फुटांची घरे देण्याच्या अटीवर निविदा काढण्यात आली.
इतकी मोठी घरे रहिवाशांना देणे विकासकांना परवडत नाही. त्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे मंडळाने राज्य सरकारला सांगितले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठक घेऊन निविदेत बदल करण्याचे, तसेच ६३५ चौरस फुटांऐवजी ६२० चौरस फुटांची घरे देत निविदा काढण्याचे निर्देश मंडळाला दिले.
अभ्युदयनगरवासियांना दिलासा
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता ६२० चौरस फुटांची घरे देऊन नव्याने निविदा काढण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी येत्या आठ दिवसांत प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच महत्त्वाचे म्हणजे अभ्युदयनगरवासियांना दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र हे घरभाडे अभ्युदयनगरवासियांना मान्य नव्हते. घरभाड्यात वाढ करण्याची त्यांची मागणी होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घरभाडे वाढविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याप्रमाणे अखेर आता घरभाड्यात वाढ करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रहिवाशांना आता दरमहा २० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय अभ्युदयनगरवासियांसाठी दिलासा ठरणार आहे.