मुंबईः सीमाशुल्क विभागाकडून स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील महिला, तिचे नातेवाईक व परिचित व्यक्तींची सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी महिलेने ती सरकारी वकील असल्याचे आणि तिचा भाऊ सीमाशुल्क विभागात अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार नूतन आयरे (५०) या अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहेत. जानेवारी २०२३ मध्ये आयरे यांना आरोपी महिला श्वेता बडगुजर हीने आपण सरकारी वकील असून आपला भाऊ पियुष प्रधान सीमाशुल्क विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले सोने कमी किमतीत मिळून देण्याचे आमिष दाखवून आयरे, त्यांचे नातेवाईक व परिचित व्यक्तींकडून सुमारे ९ कोटी ८६ लाख रुपये घेण्यात आले. आयरे यांनी एक कोटी ९० लाख रुपये दिले होते. स्वाती जावकर या महिलेनेही यात आरोपीला मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही रक्कम जावकर व आणखी दोन आरोपींनी स्वीकारली होती. पण त्यानंतरही आयरे व इतर तक्रारदारांना सोने मिळाले नाही. तसेच आरोपींनी स्वीकारलेली रक्कमही त्यांना परत करण्यात आली नाही.
हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
अखेर आयरे यांनी याप्रकरणी अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसानी सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी महिलेविरोधात २०१५ मध्ये कांदिवली व ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.