लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सुमारे ४५० गुंतवणुकदारांची २० कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूक योजना राबवणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रईसाखान पुनावाला व तिचा पती मुस्तफा बेग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे.

याप्रकरणी बिल्किस अफरोज शेख (४८) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पूनावाला आणि बेग हे आर. के. इंटिरियर नावाची कंपनी सांताक्रुझ पश्चिम येथे चालवत होते. त्यांनी गुंतवणुकदारांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी ९० ते १०० दिवसात गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट पैसे देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदार शेख (४८) या बुटीक चालवतात. पुनावाला ही त्यांची छोटी बहिणी असल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून सुमारे १८ लाख रुपये गुंतवले. शेखने तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांनाही तिच्या बहिणीच्या कंपनीत पैसे गुंतवून नफा कमावण्यास सांगितले. बहुतेक गुंतवणुकदार हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि लहान व्यावसायिक आहेत.

आणखी वाचा-ई तक्रारीमुळे देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करणे शक्य

एका गुंतवणुकदाराने आठ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. शेखच्या संदर्भावर विश्वास ठेवत शेकडो नागरिकांनी शेख यांच्यामार्फत पूनावालाकडे पैसे गुंतवले. बहुतांश गुंतवणूक रोख स्वरूपात होती. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर पूनावालाने व्याज व मुद्दल तक्रारदारांना दिली नाही. याबाबत गुंतवणुकदारांनी शेख यांना विचारण्यास सुरुवात केली. शेखने धाकटी बहीण पूनावालाकडे पैशांची मागणी केल्यानंतर तिने तिला एकूण सहा कोटी २१ लाख रुपयांचे धनादेश दिले. त्यानंतर पूनावाने शेख व त्यांच्या पतीचे धनादेश घेऊन तक्रारादारांना शेख यांची स्वाक्षरी करून दिले. त्यावेळी अनेकांनी धनादेश बँकेत जमा केले. पण खात्यात रक्कम नसल्यामुळे ते वठले नाहीत. त्यावेळी गुंतवणुकदारांनी शेख यांच्याविरोधात धनादेश न वठल्याप्रकरणी खटला दाखल केला. त्यानंतर शेख यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी सुसज्ज पडताळणी केंद्र उपलब्ध करणार

पोलिसांनी यापूर्वीही पूनावाला आणि त्यांच्या पतीवर अशाच प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, पोलिसांनी ४४३ गुंतवणुकदारांना या प्रकरणात समाविष्ट केले नव्हते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी पूनावाला आणि त्यांचे पती बेग यांच्यावर भादंवि कलम १२० ब (गुन्हेगारी कट), ४०६ (गुन्हेगारी विश्वासाचा भंग), ४०९ (लोकसेवक, बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे गुन्हेगारी विश्वासभंग) आणि ४२० (फसवणूक) सह महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) कायदा कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.