मुंबई : मध्य रेल्वेने पावसाळी पूर्व कामांमध्ये नालेसफाई, मायक्रो टनेलिंग करणे, जादा पंप बसविणे, चिखल-गाळ काढणे, पॉइंट मशीनमधील बिघाड टाळण्याचे दावे केले होते. मात्र, रविवारी रात्रीपासून पडलेल्या पावसाने मध्य रेल्वेचे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. सलग दोन दिवस मध्य रेल्वेचा भोंगळ कारभाराचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे ७०० ते ८०० लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहर आणि उपनगरांत रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले. सोमवारी पहाटेच्या सुमारास भांडूप-नाहूर दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने, ठाणे ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली. तसेच सकाळच्या सुमारास कुर्ला, शीव, चुनाभट्टी येथे रेल्वे रूळावर पाणी भरल्याने लोकल एकाच ठिकाणी थांबल्या. ठाण्यापासून सीएसएमटीपर्यंत आणि पनवेलपासून थेट सीएसएमटीपर्यंत लोकल धावत नसल्याने प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले. मात्र, पावसाचा जोर जसा जसा कमी झाला. तशा गाड्या मार्गस्थ होऊ लागल्या. दुपारी १.३० वाजेपर्यंत सर्व लोकल मार्ग सुरू झाले. मात्र, लोकलसाठी वेगमर्यादा लागू केल्याने लोकल सेवा ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.

हेही वाचा >>>विसरभोळ्या प्रवाशांचे पाच कोटींचे साहित्य आरपीएफकडून परत; आरपीएफने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत मोहीम सुरू

रेल्वे सेवा ठप्प झाल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह मंत्री, आमदारांनाही बसला. लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईतील विविध रेल्वे स्थानकादरम्यान उभ्या होत्या. त्यात हावडा एक्स्प्रेस बराच वेळ कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात अडकली होती. या एक्स्प्रेसने मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय गायकवाड, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार प्रवास करत होते. हे सर्व आमदार अधिवेशनसाठी मुंबईत निघाले होते. मात्र, एक्स्प्रेस पुढे सरकत नसल्याने कुर्ला ते दादर दरम्यान रेल्वे रूळावरून अनिल पाटील, अमोल मिटकरी यांना पायपीट करावी लागली. यासह महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये हसन मुश्रीफ, लातूरवरून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाडीत संजय बनसोडेही अडकले होते.

महिलेने गमावले पाय

जोरदार पाऊस सुरू असल्याने कुर्ला, चुनाभट्टी, शीव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे शेकडो लोकल रद्द करण्यात आल्या. तर, शेकडो लोकल विलंबाने धावत होत्या. त्यामुले लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू होती. धक्काबुक्की करून प्रवासी लोकलमध्ये शिरत होते. यातच सोमवारी सकाळी १०.०३ वाजेच्या सुमारास बेलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वरून ठाण्याला जाणारी लोकल आली. ही लोकल पकडण्यासाठी धावणाऱ्या महिलेचा पाय घसरला आणि ती रेल्वे रुळावर पडली. तिच्या अंगावरून लोकलचा एक डबा गेला. मात्र, मोटरमनने प्रसंगावधान राखून लोकल थांबवली. त्यानंतर लोकल मागे घेत, दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला रेल्वे रूळावरून बाहेर काढले. मात्र, या अपघातात महिलेला तिचे पाय गमवावे लागले.

हेही वाचा >>>पालिकेचे दावे फोल; माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप

मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन या रेल्वेगाड्या रद्द केल्या. मनमाड- सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत चालवण्यात आली. अशा एकूण ९ रेल्वेगाड्या रद्द केल्या. यासह ३० रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. तीन रेल्वेगाड्यांचे थांबे बदलले. तर, १८ रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. रुळांवरील पाणी ओसरताच रेल्वेगाड्या सीएसएमटी, एलटीटीपर्यंत नेण्यात आल्या.

रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने सहा तासांत ३०० मिमी पाऊस पडला. त्यामुळे कुर्ला, भांडुप दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची मुख्य मार्गिका बंद केली. तसेच हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द, चुनाभट्टी दरम्यान पाणी भरले होते. त्यामुळे लोकल रद्द केल्या तर काहींचे मार्ग वळविले.- राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे मंत्री, आमदारांची रुळावरून पायपीट

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About 700 to 800 local trains were canceled on the first day of the week due to central railway mismanagement mumbai print news amy
Show comments