मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे. १६ ऑगस्ट १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्हय़ातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो. पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.
माझ्या सुरुवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो. महाराष्ट्रामध्ये ग्रामविकासमंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं, त्यामुळे पवारसाहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं. मी स्वत:बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगतानासुद्धा मला फार संकोच वाटतो. गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी पवारसाहेबांनी माझ्यावर दिली. माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवारसाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलिसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.
याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी, क्षमता आणि मेहनत या माध्यमांतून पक्षाला अधिकाधिक देण्याचा माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्यासोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुखदु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्यां माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं. माझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे, तसा आहे त्याला माझा इलाज नाही. काहींना मी आवडतो, काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा