शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आज ( १८ जून ) ठाकरे गटाच्या वतीने वरळीत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
“मोदी वगैरे सर्व झूट आहे. उद्या आमच्या हातात सरकार येऊद्या २४ तासांत मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“पाकिस्तान तीन ‘ए’ चालवतात. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका. आपला देश सुद्धा अशी तीन लोक चालवतात. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग. मोदी वगैरे सर्व झूट आहे. उद्या आमच्या हातात सरकार येऊद्या २४ तासांत मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील. मग आम्ही सकाळी बातमी वाचणार… ईडीच्या भीतीने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश. पण, घ्यायचं का नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील,” असं राऊतांनी म्हटलं.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी ‘शिल्लकसेना’ म्हणून डिवचलं, ठाकरे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “होय, खरेच ही…”
“२०२४ साली देश ताब्यात घ्यायचा आहे”
“आमची राष्ट्रीय स्तरावर ओळख ‘शिवसेना’ या चार अक्षरामुळे आहे. डुप्लिकेट नाहीतर खऱ्या शिवसेनेमुळे आहे. आपण एका युद्धात उतरलो आहोत. युद्धात नेहमी छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आपण आहोत. हा महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवू. २०२४ साली देश सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “इच्छा असेपर्यंत महाविकास आघाडीत राहू”, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“इच्छा असेपर्यंत महाविकास आघाडीत राहू”
“महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावे तिकडे, भावी मुख्यमंत्री. पण, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. हे राजकारण आहे. महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर १४५ आमदार निवडून आणू. तसेच, मुंबई महापालिका आम्ही जिंकू,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.