मुंबई : दीर्घकालीन सरासरी ओलांडण्याचा मोसमी पावसाचा कल सलग दुसऱ्या महिन्यातही कायम आहे. जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा येथे नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे.
१ जूनपासून २१ जुलैला सकाळी ८.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १३६६ मिमी आणि सांताक्रूझ येते १९४३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमानात ३ अंशांची घट झाली. दोन्ही ठिकाणी २७.४ आणि २७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
वाऱ्याची द्रोणीय स्थिती आणि गुजरातपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेली कमी दाबाची रेषा यांमुळे मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे गुरूवारी सकाळी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी येथे गुरूवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धरणांतील साठ्यात चार दिवसांत तीन टक्के वाढ
राज्यभरात ठिकठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ४ दिवसांत तीन टक्क्यांनी वाढला आहे. शनिवारी राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो बुधवारी ३३.३९ टक्क्यांवर पोहोचला.