मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपीला २० वर्षानंतर पुन्हा उत्तर प्रदेशातून अटक करण्यात रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी यश आले आहे. आरोपी २००५ पासून न्यायालयापुढे हजर होत नसल्यामुळे त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. अखेर पोलीस पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन मोठ्या शिताफीने त्याला अटक केली
हबीबुल भोलु इमाम बक्श शेख उर्फ भुल्लू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो २००३ मध्ये शिवडी परिसरात राहत होता. त्यावेळी आरएके मार्ग पोलिसांनी त्याला घरफोडीच्या गुन्ह्यांत २००३ मध्ये अटक केली होती. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर २००५ पासून तो शिवडी न्यायालयात सुनावणीसाठी अनुपस्थित राहू लागला. अखेर न्यायालयाने याची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले व त्याला फरार घोषित करण्यात आले. तेव्हापासून आरोपी पोलिसांचा समेमिरा चुकवत होता.
मुंबईतून फरार आरोपींना अटक करण्याबाबत मुंबई पोलिसांकडून नुकतीच विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यात पोलीस ठाण्यातील जुन्या गुन्ह्यांतील फरात आरोपींना अटक करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व इतर पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले. आरएके मार्ग पोलीस ठाण्यातील या पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. तसेच तो मुंबईतही सध्या वास्तव्याला नसल्याचे समजले. अखेर पोलिसांनी खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली असता. आरोपी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बबेरू तालुक्यात वास्तव्याला असल्याचे समजले. त्यानुसार उत्तर प्रदेशात एक पोलीस पथक रवाना करण्यात आले. त्यांनी तेथे जाऊन माहिती घेतली असता आरोपी हरदोली परिसरात असल्याचे त्यांना समजले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने हरदोली येथे जाऊन आरएके मार्ग पोलिसंच्या पथकाने भुल्लूला अटक केली. त्यानंतर त्याला मुंबई आणण्यात आले व न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस पथकाने तीन दिवस उत्तर प्रदेशात आरोपीची माहिती घेऊन मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. आरोपीने १५ वर्षांपासून उत्तर प्रदेशात राहत होता. तो तेथे छोटी-मोठी कामे करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.