मुंबई : चोरीच्या गुन्ह्यांत ३२ वर्षांपासून फरार असलेल्या ५० वर्षीय आरोपीला पुन्हा अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले. आरोपी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
इजाज शहाजहान शेख असे या आरोपीचे नाव असून तो दक्षिण मंबईतील रहिवासी होता. इजाजविरुद्ध १९९२ मध्ये पायधुनी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९२, ३९७ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपीने त्याच्या साथीदारांसह चोरी केली होती. यावेळी तक्रारदार जखमी झाला होता. याच गुन्ह्यांत १९९२ मध्ये त्याला पोलिसांनी अटक केली. सुरूवातीचे काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावेळी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला जामीन दिल्यानंतर याप्रकरणाची सुनावणी सुरू झाली. तो खटल्याच्या सुनावणीसाठी १९९३ मध्ये गैरहजर राहू लागला. वारंवार गैरहजर राहिल्यानंतर सत्र न्यायालयाने १९९३ मध्ये त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याप्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले.
मुंबई पोलिसांनी दाखल जुन्या गुन्ह्यांमधील फरार आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यातंना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पायधुनी पोलिसांनीही ३२ वर्षानंतर आरोपीची पुन्हा माहिती मिळविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार, तडीपार कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष रासम, सहाय्यक फौजदार परब आणि राणे यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो जे. जे. मार्ग परिसरातील बोहरी मोहल्ला येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असल्याची महिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी काम करीत असलेल्या ठिकाणी सापळा रचला. आरोपी तेथे आला असता त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पायधुनी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत ताब्यात घेतलेली व्यक्ती फरार आरोपी इजाज शेख असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला याप्रकणी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अशा प्रकारे ३२ वर्षांपासून पोलिसांचा समेमिरा चुकवून स्वतःची ओळख लपवून राहणाऱ्या शेखला पोलिसांनी पुन्हा पकडले.