मुंबई : प्राथमिक उपचारांचा अभाव, रुग्णशय्यांची तुटपुंजी व्यवस्था, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती या आणि अशा अनेक समस्यांमुळे गोरेगावमधील आरे वसाहतीतील रुग्णालयच रुग्णशय्येवर आहे. सर्पदंश अथवा मानव-वन्यजीव संघर्षातून जखमी झालेल्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. हे रुग्णालय जवळपास बंद अवस्थेत असल्याने दूरवर महापालिकेच्या ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर’मध्ये वैद्याकीय उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहेत. आरे वसाहतीतील पाड्यांतील रहिवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आरे वसाहतीत सुमारे २७ आदिवासी पाडे आहेत. परिसरात या रुग्णालयाखेरीज आरोग्य सेवा उपलब्ध नाही. रुग्णालयात अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसतात. तसेच रुग्णालय अनेकदा बंदच असते. स्थानिकांना आवश्यक असलेल्या वैद्याकीय सुविधांचा रुग्णालयात अभाव आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदिवासी पाड्यातील एका महिलेला सकाळी ७ वाजता सर्पदंश झाला होता. आरेतील रुग्णालय बंद असल्याने तसेच जवळपास कोणतेही शासकीय रुग्णालय नसल्याने सदर महिलेला उपचारासाठी तातडीने गोरेगाव येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये न्यावे लागले. त्यानंतर दुपारी १.३० वाजता त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मागील एक महिन्यात अशा दोन घटना घडल्या आहेत.
हेही वाचा >>>शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास
आरे रुग्णालय आता पूर्णपणे बंद पडले आहे. पूर्वी लहान मुले आणि गर्भवतींचे या रुग्णालयात लसीकरण करण्यात येत होते. मात्र, गेली अनेक वर्षे या रुग्णालयात लसीकरणही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. येथील रुग्णांना उपचारांसाठी गोरेगावमधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर गाठावे लागत आहे. रुग्णाला तेथे नेण्यासाठी तासाचा अवधी लागतो. अनेकदा आरे परिसरातून वाहतुकीची सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खांद्यावरून न्यावे लागते.
हेही वाचा >>>दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
आरे वसाहतीतून महामार्गावर येण्यासच अर्धा तास लागतो. त्यानंतर रुग्णालयात पोहोचायला अर्धा तास असा सुमारे एक तासाचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचल्यावर तेथे रुग्णशय्या उपलब्ध नसल्याने वा अन्य काही कारणांस्तव रुग्णावर वेळेवर उपचार होत नाहीत. दरम्यान, आरे वसाहतीतील रुग्णालय सुरू करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहेत. मात्र परिस्थिती कायम आहे.
रुग्णालय चालविण्यासाठी काही संस्थांनी स्वारस्य दाखविले होते. त्यापैकी एका संस्थेची निवड करण्यात आली होती. मात्र निवडलेल्या संस्थेने अचानक माघार घेतल्यामुळे पुन्हा निविदा काढून एका वैद्याकीय संस्थेची निवड करण्यात येईल. – सूर्यकांत खटके, साहाय्यक कार्यकारी अधिकारी, आरे प्रशासन