मुंबई : Shiv Sena chief Balasaheb Thackeray शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्र अनावरण समारंभास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी उपस्थित राहणार नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेने दोन कार्यक्रमांचे आयोजन केले असून ठाकरे तेथे उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळातील ठाकरे गटाचे मोजके पदाधिकारी विधिमंडळातील कार्यक्रमास हजर राहतील आणि नंतर मेळाव्यास जाणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा विधानभवनातील समारंभ सायंकाळी सहा वाजता होणार असून निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. राजशिष्टाचारात ते बसत नसल्याचे विधानभवनातील उच्चपदस्थांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याने त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याचे ठाकरे टाळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेचा दरवर्षीप्रमाणे षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर रिगल सिनेमासमोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यासाठीही उद्धव ठाकरे सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास जाणार आहेत. ते झाल्यावर ठाकरे यांनी काही वेळ तरी विधानभवनातील समारंभास हजेरी लावावी, असे प्रयत्न वरिष्ठ राजकीय नेत्यांकडून होत आहेत. पण ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. शिवसेनेचा कार्यक्रम दरवर्षी साधारणपणे सायंकाळीच असतो.
यासंदर्भात शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेनेचे दोन कार्यक्रम सोमवारी सायंकाळी होणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथे असतील, मला अन्य बाबींची माहिती नाही, असे सांगितले.